अग्रिम भरपाई कशी ठरते?
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरनुसार, समितीच्या सर्वेक्षणात त्या मंडलातील उत्पादन गेल्या सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आल्यास सूत्रानुसार अग्रिम भरपाई मिळते. म्हणजेच त्या मंडलातील शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम दिली जाते.
हे उदाहरणातून समजून घेऊयात. समजा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मांजरी मंडलात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस झाला नाही. सर्वेक्षणातही ही बाब सिद्ध झाली आणि जिल्ह्याधिकाऱ्यांनी अग्रिम भरपाईची अधिसूचनाही काढली. मग अग्रिम भरपाई कशी मिळेल ते पाहू. समजा मांजरी मंडळातील गेल्या सात वर्षांतील सोयाबीनचे सरासरी उत्पादन १० क्विंटल आहे. पण यंदाचे उत्पादन ५ क्विंटलच आले. मग अग्रिम भरपाईच्या सूत्रानुसार भरपाई किती मिळेल?
अग्रिम भरपाईचे सूत्र
सरासरी उत्पादन – यंदाचे उत्पादन
————————————————————– x संरक्षित रक्कम x २५%
सरासरी उत्पादन
आता आकडेमोड करू….
सरासरी उत्पादन १० क्विंटल – यंदाचे उत्पादन ५ क्विंटल
————————————————–x संरक्षित रक्कम ५० हजार x २५% = ६२५० रुपये
सरासरी उत्पादन १० क्विंटल
या सूत्रानुसार मांजरी मंडलातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी ६ हजार २५० रुपये अग्रिम नुकसान भरपाई दिली जाईल.
२५ टक्के अग्रिम भरपाई मिळाली पुढे काय?
समजा मांजरी मंडळातील शेतकऱ्यांना पीकविमा समितीच्या अहवालानंतर देय असलेली २५ टक्के रक्कम मिळाली. जी आपल्या अंदाजानुसार ६ हजार २५० रुपये आहे. मग एवढाच विमा मिळेल का? तर असं नाही. मग शेतकऱ्यांना असेही वाटेल, की आता २५ टक्के मिळाली म्हणजे पुन्हा याच्या तीनपट मिळेल. पण असंही नाही. कारण पीक कापणी प्रयोगानंतर विमा भरपाई काढण्याचे सूत्र वेगळे आहे. पीक कापणी प्रयोगानंतर एवढंच उत्पादन आलं, तरी तुम्हाला अग्रिम भरपाई मिळालेल्या रकमेच्या हिशेबाने भरपाई मिळणार नाही. कारण पीककापणी प्रयोगानंतर नुकसान भरपाई काढताना उंबरठा उत्पादन काढण्याचे सूत्र वेगळे असते. पीककापणी प्रयोगानंतर सूत्रानुसार देय असलेल्या रकमेतून अग्रिम भरपाईची रक्कम वजा केली जाईल. समजा मांजरी मंडलात नंतर पीककापणी प्रयोग झाले. सूत्रानुसार हेक्टरी भरपाई १५ हजारच निघत असेल तर या १५ हजारांमधून अग्रिम भरपाई मिळालेले ६ हजार २५० रुपये वजा केले जातील. आणि उरलेली रक्कम पुन्हा शेतकऱ्यांना मिळेल. हे फक्त उदाहरण आहे, प्रत्यक्ष भरपाई वेगळी असू शकते. पण समजा उत्पादन पीक कापणी प्रयोगानंतर उंबरठा उत्पादनाएवढे किंवा त्यापेक्षा जास्त आल्यास भरपाई मिळणार नाही.