चरित्र पडताळणी दाखला काढायचायं का? ऑनलाईन अर्ज करा, १२३ रूपयांच्या शुल्कात ७ दिवसांत मिळेल प्रमाणपत्र
अर्जासोबत केवळ आधारकार्ड, पॅनकार्ड व एक फोटो लागतो. त्यानुसार संबंधिताला ७ दिवसात त्या पोलिस ठाण्याकडून दाखला दिला जातो.
चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी कागदपत्रे
- – आधार कार्ड
- – मतदान कार्ड
- – पॅन कार्ड
- – जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
कागदपत्रे
- – अर्जदाराचा फोटो
- – अर्जदाराची स्वाक्षरी
- – पोलिस अधीक्षकांच्या नावे अर्ज
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज
- १) चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. आपले सरकार पोर्टल किंवा चारित्र्य पडताळणीच्या पोर्टलवर जाऊन अर्जदाराने नोंदणी करावी.
- २) नोंदणी करताना आपण ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो (शहरी किंवा ग्रामीण) त्याची निवड करावी. एकदा फॉर्म सबमिट केल्यास पुन्हा चूक दुरुस्त करता येत नाही. नोंदणीनंतर युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
- ३) चारित्र्य पडताळणी हा पर्याय निवडल्यानंतर दोन प्रकारचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळतील. त्यात सर्वसामान्य चारित्र्य पडताळणी व सिक्युरिटी गार्डसाठी आणि परदेशात नोकरीला जाण्यासाठी किंवा इतर कारणासाठी चारित्र्य पडताळणी असे प्रकार आहेत. त्यातील एक पर्याय निवडावा.
- ४) फॉर्म भरताना वैयक्तिक माहिती, सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ज्या कंपनीत किंवा कार्यालयात जमा करणार आहोत, तेथील कार्यालयाचा किंवा कंपनीचा पत्ता टाकावा. त्यानंतर आपण कुठे वास्तव्य केले आहे. किती काळ केले आहे त्याची माहिती भरावी. पुढील पानात आपल्यावर गुन्हा झाला असल्यास ‘एस’ किंवा नसल्यास ‘नो’ म्हणावे.
- ५) अर्जदार जेवढ्या कालावधीत संबंधित जिल्ह्यात वास्तव्यास आहे, तेवढ्याच कालावधीचा तेथील संबंधित पोलिस ठाण्याकडून चारित्र्य पडताळणी दाखला मिळतो. त्यानंतर सध्या तो जेथे राहायला आहे, त्याठिकाणी अर्ज करून त्या कालावधीतील चारित्र्य पडताळणी दाखला त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनच घेऊ शकतो.
ठळक बाबी.
- ऑनलाइन अर्जासाठी १२३ रुपये शुल्क आहे.
- चारित्र्य पडताळणी कशासाठी पाहिजे, त्याचे कारण नमूद करावे लागते.
- एखादी कंपनीला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी दाखला मागते.
- पासपोर्ट काढताना अर्जदार व्यक्तीची चारित्र्य पडताळणी पोलिसांकडे केली जाते.
- एखादा व्यक्ती आपल्यावर गुन्हा दाखल आहे की नाही, याच्या खात्रीसाठी दाखला काढू शकतो.
- आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो, वैयक्तिक माहिती, कशासाठी व कोणाला द्यायचा आहे, याची माहिती भरावी लागते.
ऑफलाईन अर्ज कोणासाठी?
सरकारी सेवेत मोठ्या पदावर निवड झालेल्या संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्तीपूर्वी चारित्र्य पडताळणी केली जाते. शासनाच्या वतीने ही पडताळणी होते. त्यावेळी संबंधित व्यक्तीला ऑफलाईन अर्ज करावा लागतो. ऑफलाईन पडताळणीची मुदत ३० दिवसांपर्यंत असते. ऑफलाईन पडताळणीत त्या व्यक्तीला स्वत:च्या हस्ताक्षरात अर्ज द्यावा लागतो आणि दोन साक्षीदाराचे जबाब देखील त्यासोबत घेतले जातात.त्या कर्मचाऱ्याची सखोल पडताळणी होऊन पोलिसांकडून चारित्र्य पडताळणीचा दाखला दिला जातो.